ब्रेकिंग न्यूज


महाराष्ट्र

एकदा फसलेले कराडकर पुन्हा फसणार?


एकदा फसलेले कराडकर पुन्हा फसणार?

उद्या होणाऱ्या मतदानातून कराडकर यशवंत विचारांचे रक्षण करतात की, यशवंत विचारधारा कायमची नष्ट करू पाहणाऱ्यांना कराड पालिकेत प्रवेश देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

एकदा फसलेले कराडकर पुन्हा फसणार? 

यशवंत विचारधारेवरील हल्ला रोखण्याची नामी संधी

पराग शेणोलकर 

कराड:

"यशवंत विचार" म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचे विचार. त्यांचे विचार सहकार, कृषी, औद्यगिक विकास, लोकशाही आणि राष्ट्रनिष्ठा, धर्मनिरपेक्षता यांसारख्या तत्वांवर आधारित आहेत, जे आजही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी आहेत. चव्हाणसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राला "यशवंत विचार" दिला. या विचारधारेची पायाभरणी कराड मधून झाली. आणि याच विचारधारेवर घाला घालण्याचे कामही गेल्या काही वर्षापासून सातत्याने कराडमध्ये सुरू आहे. हा विचारधारेवरील हल्ला परतवून लावण्याची नामी संधी कराडकरांना कराड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. पाहूया... उद्या होणाऱ्या मतदानातून कराडकर यशवंत विचारांचे रक्षण करतात की, यशवंत विचारधारा कायमची नष्ट करू पाहणाऱ्यांना कराड पालिकेत प्रवेश देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.




स्वर्गीय प्रेमालाताई चव्हाण, स्वर्गीय आनंदराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव मोहिते, स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर, स्वर्गीय पी, डी. पाटीलसाहेब, माजी आमदार भास्करराव शिंदे अशी अनेक मातब्बर नावे घेता येतील की, ज्यांनी यशवंत विचार जोपासला वाढवला रुजवला. यांच्या पश्चात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही यशवंत विचारधारेची पाळमुळ घट्ट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. यशवंत विचारांवर ज्या ज्या वेळी हल्ला झाला, त्या त्यावेळी या सर्व मंडळींनी एकजुटीने तो हल्ला परतवून लावला आहे. असे असलेतरी गेल्या दहा वर्षांमध्ये यशवंत विचाराला कराडमध्ये खिंडार पाडण्यात काही मंडळींना यश आले आहे. 

ज्या यशवंतराव चव्हाण यांनी आयुष्यभर सर्वसमावेशक विचार करून राजकारण केले. त्यांच्या गावात संकुचित विचार करणारे लोक आपल्या पक्षाच्या बॅनरवर चव्हाणसाहेब यांचा त्यांच्या पक्षाशी काहीही संबंध नसताना त्यांचे छायाचित्र वापरत आहेत. गेल्यावेळी एमआयएमची भीती दाखवून स्वतःचे कोटकल्याण करणारी वृत्ती यावेळीही बहुजन समाजाला डावलणारी कृती वेगळ्या पद्धतीने करत असल्याचे दिसून येत आहे. एकदा फसलेले कराडकर आता पुन्हा फसण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे.

होऊ घातलेल्या कराड नगरपालिका निवडणुकीत अध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. असे असतानाही राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या राजकीय पक्षांनी मात्र मराठा समाजाला अध्यक्ष पदापासून दूर ठेवण्याची खेळी करण्याचे नेमके कारण काय? याचं कोडही मराठा बांधवांसह कराडकरांना सुटलेले नाही.  त्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये दोन्ही राजकीय पक्षांविषयी प्रचंड संताप आहे. तर अन्य धर्मीयांमध्ये ही हा मराठा समाजावर झालेला राजकीय अन्याय असल्याची भावना ते व्यक्त करताना दिसून येत आहेत. याचा उद्रेक उद्या मतपेटीतून दिसणार का? याकडेही राज्याचे लक्ष आहे.