कराड/प्रतिनिधी : -
येथील महाराष्ट्र हायस्कूल व श्री शिवाजी विद्यालय प्राथमिक शाळेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शिक्षक शशिकांत शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ.एस.ए. पवार उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनोगतात मुख्याध्यापिका पवार म्हणाल्या, अडचणींवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. साहेबांना शिक्षणाची विलक्षण तळमळ होती. 1930 साली पुण्यातील वकृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतानाही मित्राच्या मदतीने त्यांनी प्रवास केला. परिस्थितीवर मात करत शिक्षण घेता येते आणि आयुष्यात मित्रसंपत्ती ही सर्वात मोठी ताकद असते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक लादे, ज्येष्ठ शिक्षक शशिकांत शिंदे, राजेंद्र ठाकरे, संदीप घुलुम, शिक्षिका उमा राजमाने यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सतेश सूर्यवंशी आणि धनश्री कुलकर्णी यांनीही उपस्थित राहून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.जे. खाडे यांनी केले. तर एम.जे. सूर्यवंशी यांनी आभार मानले.