तर, मराठ्यांनो म्हणयला लागेल…
या...या.. आमच्या बोकांडी बसा....
पराग शेणोलकर
कराड :
कराड पालिकेच्या नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असतानाही त्याठिकाणी मध्यंतरीच्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा सोडविल्याचा डंका पिटणाऱ्यांनी दुसऱ्याच प्रवर्गातील उमेदवाराला पुढे केले आहे. इतर ठिकाणच्या आरक्षणात मराठ्यांसह इतर खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना घुसखोरी करता येत नसल्याने या प्रवर्गात इतर मागास प्रवर्गातील उमेदवार का रेटण्यात आला, याचा विचार करुन करुन कराडकरांचे डोके भनाणले आहे.
हे भनाणलेले डोके... येत्या दोन तारखेला एक गठ्ठा मतदान खुल्या प्रवर्गातील कोणत्याही एका उमेदवाराला सर्व मराठा आणि खुल्या प्रवर्गप्रेमींनी करणे आवश्यक आहे. नाहीतर मराठ्याने म्हणायला...तयार रहा...या...या...आमच्या बोकांडी बसा. एकंदरच या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज काय खुलासा करणार, याकडे कराडकर मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण राज्य ढवळून निघाल्यानंतर त्यासाठीच्या कार्यवाहीचे सोपस्कार राज्यसरकारने सुरु केले. यानंतरच्या काळात संपूर्ण मराठा क्रांती मोर्चाच मोडून काढण्याचे कारस्थान रचण्यात आले. समन्यवयक नावाची संपूर्ण यंत्रणाच नंतर नेस्तनाबूत झाली. यानंतर मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला एकवटत संपूर्ण राज्यात भगवे वादळ उभे केले. मुंबईला धडक देण्यासह होणाऱ्या आमरण उपोषणापुढे सरकारने नमते घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे आरक्षणाअभावी पिचलेल्या मराठा समाजावरील अन्याय दूर केल्याचे सांगितले होते. याचवेळी त्यांनी यापुढील काळातही मराठा समाजाच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचेही स्पष्ट केले.
नुकत्याच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्या. यावेळी ओबीसींवर अन्याय होईल, अशा पध्दतीने नुकतेच कुणबी प्रमाणापत्र मिळालेल्यांना त्या प्रवर्गातून उमेदवारी देणार नाही, असे पक्षीय धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार राबविण्यात आले. यानुसार अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाल्याचेही दिसून आले. एकीकडे हे धोरण तर कराड आणि सातारा येथे खुल्या प्रवर्गात इतर प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात आली. यामुळे मराठा समाजात मोठी खदखद आहे. एकंदरच मराठा समाजाला कराडच्या नगराध्यक्षपदाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी चालून आली असताना, त्यात अचानक दुसऱ्या प्रवर्गाची घुसखोरी पक्षीय आणि संघटन पातळीवर झाली. यामुळे पक्षीय आणि संघटन पातळीवर अनेकांची घुसमट झाली.
उमेदवारी मिळवल्याच्या पद्धतीवर आक्षेप
कमालीचे संघटन कौशल्य असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळवून देणाऱ्या, तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवणाऱ्या जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांचा निर्णय डावलत पक्षातील वजन वापरून उमेदवारी मिळवल्याच्या पद्धतीवर त्यांच्याच पक्षातील, समाजातील लोकांनी जाहीर केलेली तीव्र नाराजी मतदानातून उमटू शकते. याची जाणीव नक्कीच राज्याचे धुरंदर राजकारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर ते कोणत्या तोडगा काढणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
मेगा भरती….
वर्षानुवर्षे दुसऱ्या पक्षाच्या कासंडीला चिकटून रक्त,दुध शोषलेल्या गोचीडांची देखील निवडणूकीच्या तोंडावर कराडात मेगा भरती शिबिर झाले. भरती शिबिरात सहभागी होत रक्त,दुध पिवून फुगलेल्या या गोचीडांनी पहिल्या पक्षाला नावे ठेवत विकासासाठी या पक्षात आल्याची जाहीर कौतुके सांगण्यास सुरुवात केली. ही कौतुके स्वत:चा उकीरडा झाकण्यासाठी होती का इतर काही स्वार्थ साधण्यासाठी आहेत, याविषयीही कराडात संभ्रम आहे. मेगा भरतीच्या इव्हेंटमुळे गालफुगी झालेल्यांनी दिवसाढवळ्या खुल्या प्रवर्गातील आरक्षणावर दरोडा टाकला आहे. या दरोड्याबाबत आज मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस या बोलणार आणि मराठा समाजाचा कैवार कसा सांगणार याकडे कराडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
बी टीम ओळखरे भीडू
निवडणूक म्हटले की,प्रबळ उमेदवाराच्या मतांची विभागणी करण्यासाठी काही डमी उभे केले जातात. हा प्रकार सर्वच ठिकाणी होत असतो. थोडी थोडी मते विभागल्यास त्याचा फायदा आपल्याला होणार हे गृहीतक मानत प्रबळ पक्ष असे धोरण नेहमीच राबवतात. कराडात देखील तसेच झाल्याची चर्चा आहे. कराडातील सुज्ञ आणि खुल्या प्रवर्गातील मतदारांनी प्रवर्गात घुसखोरी करणाऱ्यांची बी टीम म्हणून कोण काय करतेय, हे ओळखून नेमक्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या पारड्यात एक गठ्ठा मते टाकणे आवश्यक आहे. असे नाही तर म्हणावे लागेल.. या...या. आमच्या बोकांडी बसा.