ब्रेकिंग न्यूज


महाराष्ट्र

सह्याद्रीत ‘तारा’ची मुक्त झेप


सह्याद्रीत ‘तारा’ची मुक्त झेप

कराड/प्रतिनिधी : -

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रवाढीसाठी महत्त्वाचा टप्पा गुरुवारी साध्य झाला. नियंत्रित पिंजऱ्यातून अनुकूलन प्रक्रियेनंतर ठेवण्यात आलेली वाघीण STR T–04 ‘तारा’ हिला अखेर चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्या मुक्त करण्यात आल्याने चांदोली राष्ट्रीय उद्यानात ‘तारा’चे पहिले मुक्त पाऊल पडले.

१८ नोव्हेंबर रोजी एनक्लोजरचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र दोन दिवस वाघीण आतच फिरत राहिली. तिने नैसर्गिक शिकार करून तीच खात, परिस्थितीचा सहज स्वीकार केल्याचे तज्ज्ञांनी निरीक्षणात पाहिले. गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ‘तारा’ने डौलदार पावलांनी एनक्लोजर सोडले आणि जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले.

चांदोलीत आगमनानंतर वाघीणीचा संपूर्ण अनुकूलन टप्पा वैज्ञानिक पद्धतीने राबविण्यात आला. तिची हालचाल, शिकार प्रवृत्ती, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, नैसर्गिक प्रतिक्रिया आणि क्षेत्रचिन्हीकरण यांचे वन्यजीव तज्ज्ञ व भारतीय वन्यजीव संस्थेच्या (WII) अधिकाऱ्यांनी सातत्याने निरीक्षण केले. नियमित तपासणीनंतर तिला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले.

२४ तास निरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा आधार

वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आला असून सॅटेलाइट टेलीमेट्री व VHF ट्रॅकिंग च्या माध्यमातून तिच्या हालचालीवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान व भारतीय वन्यजीव संस्थेची विशेष प्रशिक्षित पथके कार्यरत आहेत.

‘तारा’मुळे संवर्धन उपक्रमाला नवी उभारी

राज्य शासन आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त प्रयत्नांतून व्याघ्र संवर्धन व पुनर्वसनाची दिशा अधिक मजबूत होत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. या मुक्तीमुळे जैवविविधता वाढ, पर्यावरणीय संतुलन आणि भविष्यातील व्याघ्र पर्यटनाला नवी चालना मिळण्याची शक्यता आहे.

  • मुख्य निरीक्षण घटक :
  • · उपग्रह व VHF आधारित हालचाल विश्लेषण
  • · फील्ड पथकांकडून क्षेत्रनिहाय पडताळणी
  • · निवासस्थाने व शिकार प्रवृत्तीचा नोंदवही अहवाल
  • · मानव–वन्यजीव संघर्ष प्रतिबंध उपाययोजना
  • · तत्पर पशुवैद्यकीय प्रतिसाद पथक


‘तारा’ने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दाखवली. ती स्वावलंबी जीवनासाठी पूर्णतः सिद्ध आहे. पुढील निरीक्षण प्रक्रिया वैज्ञानिक आणि जबाबदार पद्धतीने राबवली जाईल.

- तुषार चव्हाण (क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प)

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. वाघीणीचे नैसर्गिक वर्तन व आरोग्य समाधानकारक असून तिचे सतत निरीक्षण सुरू आहे. या उपक्रमामुळे सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडेल.

- एम. एस. रेड्डी (प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य)

‘तारा’ वाघीणीच्या मुक्त विहारामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र पर्यटनाला भविष्यात नवी दिशा मिळेल. 

- रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक)